Template:Wy/mr/भंडारदरा

From Wikimedia Incubator
भंडारदरा धरण अंब्रेलाफॉलसह

भंडारदरा — जागेचा धरणाच्या दृष्टीने शोध १९०३ मध्ये ऑर्थर हिल या इंग्रज अभियंत्याने लावला. त्यानंतरचे सर्वेक्षण सहाय्यक अभियंता एच. ओ.बी.पुली यांनी कार्यकारी अभियंता एच. ओ.बी.शौब्रीज यांच्या मार्गदर्शनाखाली केले. पुढे धरण बांधण्याच्या कामास १९१० साली तत्कालीन चीफ इंजिनियर ऑर्थर हिल यांच्या हस्ते सुरु झाले. भंडारदरा हे त्याकाळचे भारतातील सर्वात उंच धरण म्हणून ओळखले जाते. ते चुना, वाळू यांच्या मिश्रणातून बांधण्यात आले. पुढे त्याला आधुनिक तंत्रज्ञानाने आधार देण्यात आला.धरणाच्या भिंतीची उंची ८२.३२ मी. व तळाची रुंदी ७१.२८ मीटर आणि माथ्यावरील रुंदी ७ मीटर आहे. धरणाला एकूण ८ मो-या असून त्यांचा व्यास ४ मीटर एवढा आहे. धरणाचे काम १९२६ साली पूर्ण झाले. त्याच वर्षी १० डिसेंबर १९२६ रोजी गवर्नर लेस्ली वेलस्ली यांच्या हस्ते धरणाचे उदघाटन करण्यात आले. धरणाला त्याकाळी विल्सन डॅम तर धरणाच्या पाणीसाठ्याला ऑर्थर हिल यांचे नाव देण्यात आले. धरणाच्या २०० फुटावरील व्हॉल्व्हद्वारे पाणी नदीपात्रात सोडले असता ते खडकावरून खळखळ वाहत नदीपात्रात झेपावते. त्यावेळी ते दृश्य एखाद्या भव्य छत्रीसारखे दिसते. म्हणून या धबधब्याला अंब्रेला फॉल असे म्हणतात. छत्रीच्या आकाराचे पाणी नदीपात्रात झेपावते तेव्हा पर्यटक भान हरपून ते दृश्य पाहत असतात. धबधब्यातून उडणारे असंख्य तुषार पर्यटकांना चिंब भिजवून टाकतात. पावसाळ्यात अतिरिक्त पाणी जेव्हा स्पील वे मधून सोडले जाते तेव्हा ते पाणी प्रचंड वेगाने वाहत जाते. ते दृश्य नक्कीच अनेक वर्ष डोळ्यांसमोर तरळत राहते.